कोरोना व्हायरस नवी लक्षणं कोणती? कोव्हिड-19 पासून संरक्षण कसं करायचं?
कोरोनाची लक्षणे
कोरोना व्हायरस थेट तुमच्या फुप्फुसांवर हल्ला करतो. यामुळे दोनपैकी एक लक्षण तुमच्यात दिसू लागतं.
एक तर ताप किंवा कोरडा खोकला. यापैकी काहीही झालं तरी श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.
मात्र हा खोकला काही थांबत नाही. असंही होऊ शकतो की तुम्ही तासन् तास खोकतच आहात, किंवा दिवसांतून तीन-चार वेळा सातत्याने खोकत आहात.
तुमच्या नेहमीच्या खोकल्यापेक्षा हे जास्त गंभीर वाटू शकतं, त्यामुळे जरा जपूनच. तसंच यावेळी घसा लाल होऊन दुखू लागतो.
म्हणूनच कोव्हिड-19 ची तपासणी करताना थ्रोट स्वॅब म्हणजेच घशातून घेण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी केली जाते.ताप येतो तेव्हा तुमच्या शरीराचं साधारण तापमान 37.8 सेल्सियसपेक्षा जास्त असू शकतं. यामुळे तुम्हाला जरा कणकण वाटू शकते, थंडी वाजू शकते किंवा थरथरल्यासारखंही वाटू शकतं.
याची लक्षणं दिसायला कधी पाच दिवस लागू शकतात तर कधी त्याहून जास्त. WHOनुसार हा व्हायरस आपले परिणाम तुमच्या शरीरात दाखवण्यास 14 दिवससुद्धा घेऊ शकतो. यालाच इनक्युबेशन पिरियड म्हणतात.
अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या ताज्या माहितीनुसार खालीलपैकी कोणतंही लक्षण तुमच्यात दिसलं की सतर्क व्हायला हवं,
- ताप किंवा थंडी वाजणे
- थरथरणे
- स्नायूंमध्ये दुखणे
- डोकेदुखी
- खोकला किंवा घसा खवखवणे
- चव न कळणे किंवा वास न येणे
- थकवा येणे
पूर्वी ही लक्षणांची यादी फक्त फक्त ताप, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास, एवढीच होती.
थकवा येणं आणि तोंडाची चव जाणं ही देखील आता कोरोनाची लक्षणं आहेत.
युनायटेड किंगडम सरकारने देखील ही नवी लक्षणं असल्याचं सांगितलं आहे. सातत्याने खोकला येणं, तोंडाची चव जाणं, वास न येणं ही लक्षणं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.